युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार   

किव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये एक महिन्यांची युद्धबंदीच्या हालचालींना शनिवारी प्रारंभ झाला. युक्रेन आणि त्यांच्या समर्थक देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला  आहे. युद्धबंदी कोणत्याही अटीशिवाय ती व्हावी, असा आग्रह धरला.  
 
येत्या सोमवारपासून युद्धबंदी करण्याचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती युक्रेनचे अर्थमंत्री अँड्री सायबिहा यांनी दिली. चार युरोपीय देशांचे प्रमुख किव्ह दौर्‍यावर आले आहेत. त्यामध्ये फ्रान्स इम्यॅनूल मॅक्रोन, ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर, जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज आणि पोलंडचे प्रमुख यांचा समावेश आहे.  आता युक्रेनने माघार घेत युद्धबंदीची तयारी दाखवली असून मॉस्कोने ती स्वीकारावी आणि शांततापूर्ण वातावरण तयार व्हावे, यासाठी ते आग्रही आहेत. युद्धबंदी जाहीर झाली तर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
विशेष म्हणजे रशियाने स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांची युद्धबंदी जाहीर केली. पण, त्याचे उल्लंघन रशियाकडूनच होत असल्याचा आरोप युक्रेनने केला होता.  मार्चमध्ये एका महिन्याची युद्धबंदी युक्रेनने मान्य केली होती. पण त्यासाठी रशियाने अटी घातल्या होत्या. दरम्यान, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि ब्रिटनचे नेते रेल्वेने किव्ह येथे दाखल झाले.. दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार देशांचे प्रमुख आले आहेत. त्यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्य चौकात महायुद्धातील आणि युक्रेनच्या रशिया विरोधातील युद्धात  वीरमरण आलेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांचे स्वागत  युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलन्स्की यांनी केले.

Related Articles